विधानसभेच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार गट) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून शिव स्वराज्य यात्रा काढणार आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी ही यात्रा सुरू होणार आहे. राज्य अध्यक्ष जयंत पाटील हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी चांगले प्रदर्शन केले. त्यानंतर जराही विश्रांती न घेता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. हजारो लोकांची भेट घेतली. यादरम्यान अनेक जणांच्या उमेदवारीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. याबाबत शरद पवार इतर कोणत्याही नेत्याच्या पुढेच असल्याचे दिसून आले.
अजित पवारांची राष्ट्रवादीही गुरुवारी नाशिकमधून जनसन्मान यात्रा काढणार आहे. या पार्श्वभूमिवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या दोन्ही यात्रांकडे लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा आरोप- प्रत्यारोपाची धुळवड जनतेला पाहायला मिळणार आहे. राज्य सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश जनतेपुढे करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पहिल्या १० दिवसांत ही यात्रा राज्यातील सात जिल्ह्यांत पोहोचणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची घोषणा होणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. ९ ऑगस्ट रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नारा क्रांती मैदानातून दिला गेला होता. तसेच त्या दिवशी आदिवासी दिन असल्यानेही या दिवसाची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.